आपोआप
ऋतू बदलतात, चंद्र-सूर्य उगवतात, आपोआप
माणसेही बदलतात, उगवतात मावळतात, आपोआप
तुला सोडून, कधी जाताना दूर, तुजपासून
डोळे पाणावतात, अश्रू दाटतात, आपोआप
हळूच बाहेर, ती डोकावते, खिडकीतून
नजरा मिळतात, बोलत राहतात, आपोआप
नजरेचे तीर तुझिया, घे जरा, आवरुन
खोल शिरतात, घायाळ करतात, आपोआप
कवितेत तुझ्याबद्दल, जातो कधी, लिहुन
चौकशा घडतात, चर्चा होतात, आपोआप
आयुष्याची सापशिडी, नाही खेळायची, अजुन
फ़ासे पडतात, साप-शिड्या गिळ-मिळतात, आपोआप
"वैष्णव जन तो", गेले कुणीसे, सांगून
अर्थ विरतात, तारखा उरतात, आपोआप
संसाराची घडी, गेलीये 'त्याच्या', विस्कटून
येइल तो जगात, कुठल्याशा अवतारात, आपोआप.
-प्रणव
No comments:
Post a Comment