Friday, June 13, 2008

bhar dupari

भर दुपारी

भर दुपारी निघून गेलीस

तेव्हा तुझ्या अंगावरचं

नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र

झगझगीत उन्हाबरोबर फडफडत राहिलं

कितीतरी वेळ...

तुझ्या प्राजक्तविभोर आठवणी

संध्याकाळच्या कातर क्षणांना

सांगू लागलो अंगणात

तेव्हा, आधीचेच कललेले

चाफ्याचे झाड

अजून जरासे कलले

एक दीर्घ नि:श्वास टाकत...

रात्रीच्या भव्य पटावर

तुझे नक्षत्रांकित डोळे

चांदण्यांमधे

सर्वत्र दिसले.

सर्वत्र दिसले

त्यात लपलेले माझे प्रतिबिंबही...



आणि त्यानंतर अता

ही अशी पहाट उगवली आहे सखे -

तुझ्याशिवायची...

दिवसाचा प्रदीर्घ रस्ता तुडवताना,

जर कधी श्रमलोच,

तर तुझ्या अंगावरचं

नितळ मुलायम झुळझुळीत पिवळं वस्त्र

फक्त फडफडत राहू दे माथ्यावरून...बस्स.

No comments:

Post a Comment