हिरवे पान...
कारणाशिवाय छळणा-या संध्यावेळा
आता मला सकारण छळू लागतील,
पुस्तकात ठेवलेल्या पानावरच्या
हिरव्या खूणा गळू लागतील.
ढळू लागेल मनामधून
आठवांची पाकळी एक एक
आवळू लागेल मानेवरून
बंधनांची साखळी एक एक.
एक एक करून विझतील किंवा
विझवले जातील सारे दिवे
अंगणच माझ्या घराचे लावील
परतवून चांदण्यांचे थवे.
हवे होते ते ते मिळाले
गळाले ते तसे नकोच होते
आंबट-गोडाचा प्रश्न नाही
द्राक्षांना हात लागले होते.
होते ठेवले जपून परंतु
पुस्तकात एक हिरवे पान...
त्या पानाच्या जाळीमधे अता
अडकलो मी कायमचा छान!!
No comments:
Post a Comment