ती जेव्हा बोलते ना...
ती जेव्हा बोलते ना मनातून
शब्द व्हावंसं वाटतं
ती जेव्हा चालते ना जनातून
स्तब्ध व्हावंसं वाटतं
ती हलते पानातून, मी वारा होतो
ती फुलते नभातून, मी तारा होतो
ती जेव्हा रुसते ना माझ्यावर,
ओंजळीच्या उशीत घ्यावसं वाटतं
ती जेव्हा रडते ना अनावर,
आई बनून कुशीत घ्यावसं वाटतं
ती झुलते पंखातून, मी पारवा होतो
ती गाते प्राणातून, मी मारवा होतो
ती जेव्हा सजते ना माझ्यासाठी,
तीळ बनून गाली उरावसं वाटतं
ती जेव्हा झुरतेना ना माझ्यासाठी,
काळजाला सुखात पुरावसं वाटतं
ती होते नदी, मी किनारा होतो
ती होते थंडी, मी शहारा होतो
ती जेव्हा येते ना अंधारातून,
विझून जावंसं वाटतं
ती जेव्हा येते ना पाऊस घेऊन,
भिजून जावंस वाटतं
ती पडते दवातून, मी कळी होतो
ती हसते गालातून, मी खळी होतो
ती जेव्हा वाटते ना मधासारखी,
भ्रमर व्हावसं वाटतं
ती जेव्हा असते ना माझ्याबरोबर,
अमर व्हावंसं वाटतं
ती होते ह्रदय, मी स्पंदन होतो
ती देते हात, मी बंधन होतो
ती जेव्हा मरते ना माझ्यासाठी,
तेव्हा जगावसं बाटतं
ती जेव्हा उरते ना प्रेम घेऊन,
तिला बघावसं वाटतं........
Tuesday, June 10, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
खुपच छान
Post a Comment